Friday, 7 August 2020

#धमकी आली आहे. मी नेमके काय करावे..?

     
         
                   #धमकी आली आहे. मी नेमके काय करावे..?

सर्व नागरिक प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष कर भरतात. त्यातून सरकारच्या तिजोरीत पैसे जमा होतात.

हे पैसे लोकांच्या विकास व कल्याणांच्या कामसाठी वापरायचे असतात. सरकारी पैशातून उद्योगाचा विकास, शेतीचा विकास  शिक्षणांची चांगली  सोय, आरोग्याची चांगली सोय  व  गरीब जनतेला मदत व्हावी हे करणं सरकारवर बंधनकारक असतं.

हेच काम प्रामाणिकपणे करणं सरकारचं हे मुख्य काम आहे.

दुसरं सरकारचं बेसीक काम असतं. देशाची कायदा व सुव्यवस्था राखणं.

लोकांत भांडण,चोरी,दंगली असं काही होऊ नये म्हणून दक्ष राहणं. प्रत्येक नागरिकांच्या जीवीताचे रक्षण करणं ही सरकारची पहिली जबाबदारी असते.

पण आजकाल सरकारी तिजोरीवर डल्ला मारायला मिळतो.म्हणून शासन व प्रशासनात जायचं. असाच नवा व भक्कम पायंडा पडला आहे. ही काळजीची व गंभीर गोष्ट आहे. माहिती अधिकार या डल्लामारू वृत्तीला चाप लावतो.

तुम्ही शासनाकडे अडलेल्या छोट्या कामासाठी अर्ज केलात तर तुम्हाला धमकी येणार नाही.

ज्यात पैशाचा भ्रष्टाचार झाला नसेल तर अशा अर्जासाठी ही तुम्हाला धमकी येणार नाही.

तुम्हाला काहीतरी थातूर मातूर झेरॉक्स काढून ही घ्या तुमची माहिती असे सांगून तुमची सही घेतली जाते.

जन माहिती अधिकारी यांच्यासाठी ही सोपी गोष्ट असते.

पण जिथे शासनाच्या तिजोरीवर मोठा डल्ला मारला गेला आहे. नेमकेपणानं तिथं अर्ज केला तर मात्र धमकी येण्याची शक्यता असते.

पण धमकी देण्याच्या अगोदर तुम्ही किती दमदार आहात याची चाचणी पाहिली जाते.

जनमाहिती अधिकारी किंवा अन्य कोणी मध्यस्थ तुम्हाला सपंर्क करतो.

तुम्ही खूप चांगल काम करतां याचं कौतूक करतो.

तुम्हाला चहापाणी घेण्यासाठी येण्याची विनंती करतो.

तुम्हाला काही पैसे देऊन तुम्हाला खरेदी करून चूप बसवण्याचा प्रयत्न करतो.

यात तुम्ही व ते यांच्यात काही मंडावली झाली तर हे प्रकरण तिथेंच संपून जातं.

*तेरी भी चूप मेरी भी चूप *

पण जेव्हा तुम्हाला पैशानं विकत घेतलं जाऊ शकत नाही. हे लक्षात आलं की मग मात्र मग तुमच्यावर बळाचा वापर केला जाण्याची शक्यता वाढते.

मग तुम्हाला पहिली धमकी येते.

धमकी दिल्यानंतर तुम्ही घाबरून माघार घेता का याची चाचपणी केली जाते.

तुम्ही घाबरलात तर प्रकरण थंड होऊन जातं. तुम्ही शांत झालात की त्यांच काम साधतं.

पण धमकी आली की तुम्ही पोलीसात जाता. तक्रार नोंदविता.अजिबात घाबरत नाही.

मग मात्र तुमच्यावर हल्ला होण्याची  मारहाण होण्याची शक्यता वाढत जाते.

धमकी आली किंवा हल्ला होण्याची शक्यता वाढली तर काय करायचं ?

प्रत्यक्ष जेव्हा धमकी येत असेल तेव्हा किंवा प्रत्यक्ष जेव्हा हल्ला होत असेल तेव्हा कोणीही पहिल्या पाच दहा मिनिटात किंवा पहिल्या तीन चार तासात तुमच्या मदतीला धावून येणार नाही. मित्र हितचिंतक व संघटना यांच्याकडून तुम्हाला त्याच क्षणाला मदत मिळत नसते.मदत उशिराने मिळण्याची शक्यता असते. अपवाद वगळता पोलीसाकडूनही फार सकारात्मक व आश्वात्मक मदत मिळते असा अनुभव नाही. पण पोलीसांना शंभर नंबर वर तातडीने संपर्क करा.

कारण हल्ला किंवा धमकी काही सांगून होणार नाही. ते अचानक व अनपेक्षीतपणे अंगावर आलेलं संकट असतं.

 मग यातून काही ठोस कसा मार्ग काढायचा ?

 याचे तीन मार्ग आहेत.

*१. भगतसिंगाचा मार्ग.*

*२. गांधीजींचा मार्ग.*

*३.नाकासमोर पाहून सरळ जगणे.*

*१.पहिला भगतसिंगाचा मार्ग :*
भगतसिंग म्हणतात. मी कोणाच्या बापाला भीत नाही.
मी माझा घेतला वसा टाकणार नाही.
कोणी मदतीला आले काय आणि नाही आले काय मला त्याची पर्वा नाही.
मला कोणाच्या मदतीची अपेक्षा नाही.
कारण मरणालाही न घाबरणारा भगतसिंग हा माझा आदर्श आहे.
भगतसिंगासारखं काम करायचं. दोन द्यायचे. दोन खायचे. कसलीच तक्रार करायची नाही. रडायचं नाही.
हल्ला झालाच तरी तो हिंमत्तीने पचवायची मानसिकता आपल्यात  निर्माण करायची.

*२. दुसरा गांधीचा मार्ग :*
खूपजण मिळून सामुहिकपणे काम करायचं.
आपण केलेला अर्ज सगळयांना कळेल असा सार्वजनिक करायचा.
आपल्या हितचिंतक व मित्रांचा मोठा संग्रह करायचा.
आपल्या सोबत नेहमी जनता व लोक राहतील याचा पराकोटीच्या प्रामाणिकपणे प्रयत्न करायचा.
धमकी व हल्ला करणाराला भीती वाटली पाहिजे की ----
या माणसाला हात लावला तर हजारो लोक या माणसांच्या बाजून उभे राहतील.मग तुमच्यावर हल्ला होण्याची शक्यता जवळपास नाहीशी होते.

*३. तिसरा मार्ग: नाकारसमोर पाहून सरळ जगणे.*
माहिती अधिकार अर्ज करणे. भ्रष्टाचार उघडा पाडणे या भानगडीत पडायचे नाही.
ना अर्ज करायचे ना आवाज उठवायचा.
कोठेतरी सकाळी दहा ते संध्याकाळी सहा अशी दहा- पाच हजाराची नोकरी करायची.
हा सगळा येडा नाद सोडून नाकासमारे पाहून सरळ चालायचे.

बस्‌ हे तीन मार्ग आहेत.

यावर तुम्ही विचार करा

*तुमचा मार्ग निवडा व त्या मार्गावर चालत रहा.*
- सुभाष  बसवेकर

जनहितार्थ:-
मानवाधिकार आणि ग्राहक संरक्षण.
{Affiliate of Muktai Foundations}
विकास पाटील-बाबर.

No comments:

Post a Comment